पिंपरी-चिंचवडचे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम; चेतन पवार यांचा दावा

पिंपरी-चिंचवडचे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम; चेतन पवार यांचा दावा

- पिंपरी | दिनांक २जून,प्रतिनिधी(माझा इंडिया न्यूज)
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावरील विश्वास कायम असल्याचे स्पष्ट करत पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसैनिक पक्षासोबत ठामपणे उभे असल्याचा विश्वास शहरप्रमुख चेतन पवार यांनी व्यक्त केला. गुरुवारी (२ जुलै) चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व शेकडो शिवसैनिकांनी मुंबईतील मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षातील काही नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्येही फूट पडणार असल्याच्या चर्चांना या बैठकीमुळे पूर्णविराम मिळाल्याचा दावा करण्यात आला. उपस्थित पदाधिकारी आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त करत पक्षाशी निष्ठा कायम ठेवण्याची ग्वाही दिली.
यावेळी चेतन पवार यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड शहरातील एकही शिवसैनिक किंवा पदाधिकारी पक्ष सोडणार नाही. आगामी काळात शाखा आणि बूथ स्तरावर संघटन अधिक मजबूत करण्यासाठी जनसंपर्क वाढविणे, नव्या कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडणे आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
शहरातील शिवसेना संघटना अधिक सक्षम करून सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.
– माझा इंडिया न्यूज




