पिंपरी-चिंचवड स्थायी समितीची बैठक संपन्न; आरोग्य, शिक्षण व विकासकामांच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावांना मंजुरी

पिंपरी-चिंचवड स्थायी समितीची बैठक संपन्न; आरोग्य, शिक्षण व विकासकामांच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावांना मंजुरी
माझा इंडिया न्यूज | पिंपरी | प्रतिनिधी : 02जुलै2026
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक बैठक बुधवारी (१ जुलै) महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात पार पडली. स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, स्वच्छता, अग्निसुरक्षा आणि पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली.
सभापती अभिषेक बारणे यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाकडून मंजूर झालेल्या ५ कोटी रुपयांच्या निधीतून मराठी शाळांच्या दर्जोन्नतीसह आरोग्य, महिला कल्याण, पर्यावरण आणि पर्यटनविषयक विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याणकारी योजना’ प्रभावीपणे राबविण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
बैठकीत आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत रुग्णालयांसाठी आवश्यक औषधे, उपभोग्य साहित्य आणि ऑर्थोपेडिक साहित्य खरेदीस मंजुरी देण्यात आली. याशिवाय विविध औषधांच्या खरेदीलाही हिरवा कंदील दाखविण्यात आला.
औद्योगिक प्रशिक्षण विभाग, मोरवाडी अंतर्गत MS-CIT उपकेंद्रांना मान्यता देण्यात आली असून महिला, अनुसूचित जाती-जमाती, भटक्या-विमुक्त घटकांतील लाभार्थ्यांना १० टक्के शुल्कात, तर ४० टक्क्यांहून अधिक दिव्यांगत्व असलेल्या लाभार्थ्यांना केवळ ५ टक्के शुल्कात संगणक प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
झोपडपट्टी भागातील सेवाशुल्क बिले वाटप व जनजागृतीचे काम महिला बचत गटांकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच प्रभाग क्रमांक २० मधील सार्वजनिक शौचालयांच्या साफसफाईच्या कामाला मुदतवाढ देण्यात आली.
याशिवाय रावेत येथील एक्सप्रेस फिडरवर अखंड वीजपुरवठ्यासाठी स्वयंचलित यंत्रणा उभारणे, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ड्रेनेज कामे, सांगवी स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनीची देखभाल-दुरुस्ती तसेच शहरातील जलशुद्धीकरण केंद्रे व पंप हाऊसमध्ये अत्याधुनिक अग्निशामक यंत्रणा बसविण्याच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली.
या बैठकीस महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप, स्थायी समिती सदस्य तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सभापती अभिषेक बारणे यांनी सांगितले की, “पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका कटिबद्ध असून, जनहिताचे सर्व निर्णय वेळेत आणि प्रभावीपणे राबविले जातील.”
— माझा इंडिया न्यूज




