पथविक्रेत्यांच्या मागण्यांसाठी आमरण उपोषण – शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक युवराज दाखले यांचा फेरीवाला हॉकर्स महासंघाला जाहीर पाठिंबा

पथविक्रेत्यांच्या मागण्यांसाठी आमरण उपोषण – शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक युवराज दाखले यांचा फेरीवाला हॉकर्स महासंघाला जाहीर पाठिंबा

पिंपरी-चिंचवड, दि. १८: प्रतिनिधी (माझा इंडिया न्युज ) फेरीवाला हॉकर्स महासंघ महाराष्ट्र यांच्या वतीने पथविक्रेता, हातगाडी, टपरी, पथारी धारकांच्या न्याय्य मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका गेट समोर सकाळी 11 वाजता सुरू करण्यात आलेल्या आमरण उपोषणाला शिवशाही व्यापारी संघाने जाहीर पाठिंबा दिला आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधला व त्यांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगितले.
उपोषणाचे नेतृत्व प्रल्हाद भाऊ कांबळे हे करत असून यावेळी युवराज दाखले यांनी मनपा प्रशासन व आयुक्तांना इशारा दिला. “पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथविक्री नियमन) महाराष्ट्र योजना 2014 ची तात्काळ अंमलबजावणी करा. फेरीवाल्यांवर होणारी कारवाई थांबवा व त्यांना ओळखपत्र व अधिकृत परवाने द्या,” अशी मागणी युवराज दाखले यांनी केली.
युवराज दाखले म्हणाले, “पथविक्रेते हे शहराच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. गरीब कुटुंबे हातगाडी, टपरी चालवून पोट भरतात. त्यांच्यावर लाठीमार करणे, दंडेलशाही करणे हा अन्याय आहे. महापालिकेने तात्काळ स्ट्रीट व्हेंडर्स झोन निश्चित करून त्यांना अधिकृत जागा उपलब्ध करून द्याव्यात. जोपर्यंत फेरीवाल्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत शिवशाही व्यापारी संघ व हिंदू मातंग सेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.”
फेरीवाला हॉकर्स महासंघाच्या प्रमुख मागण्या:
1. पथविक्रेत्यांवर अतिक्रमणाची कारवाई थांबवावी
2. ओळखपत्र (ID Card) व अधिकृत परवाने तात्काळ द्यावेत
3. पथविक्रेत्यांना पक्क्या स्वरूपात गाळे उपलब्ध करून द्यावेत
4. पथविक्रेता कायदा 2014 ची अंमलबजावणी करावी
5. अधिकृत जागांचे वाटप करून व्यवसायास स्थिरता द्यावी
6. उर्वरित पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करावे
“महापालिका आयुक्तांनी 48 तासांत बैठक लावून तोडगा काढावा. अन्यथा शिवशाही व्यापारी संघ, हिंदू मातंग सेना व फेरीवाले मिळून महापालिकेवर धडक मोर्चा काढू,” असा सज्जड इशारा युवराज दाखले यांनी दिला
—
पिंपरी-चिंचवड महापालिका गेट समोर फेरीवाला हॉकर्स महासंघाच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देताना शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले. सोबत उपोषणाचे नेते प्रल्हाद भाऊ कांबळे , शिवशाही व्यापारी संघ प्रदेश अध्यक्ष कृष्णा साबळे, उद्योजक अनिल दादा गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे,मांगल्य प्रतिष्ठाचे संस्थापक अध्यक्ष राजू आवळे, शिवशाही माथाडी कामगार आघाडी प्रदेश अध्यक्ष सचिन दोनगहू, आदी इतर पदाधिकारी उपस्थित होते.
—




