
नीट २०२६ पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
– नीट पेपरफुटी प्रकरण तापले; सखोल चौकशीसाठी छावा संघटनेचे निवेदन
– नीट परीक्षेतील संशयित क्लासेसची चौकशी करा; विद्यार्थ्यांना न्याय द्या 
पुणे, दि. 16 – देशभरात गाजत असलेल्या नीट २०२६ पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी चिंता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छिंद्र चिंचोळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नीट परीक्षेतील गैरप्रकारांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. लातूर येथील काही क्लासेस तसेच पुण्यातील काही संस्थांबाबतही संशय व्यक्त केला जात असून, या सर्वांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, काही क्लासेस नियमबाह्य पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवत असून विद्यार्थ्यांची आर्थिक व मानसिक फसवणूक केली जात आहे. मोठमोठ्या ब्रँडच्या नावाखाली शिक्षण क्षेत्रात गैरप्रकार सुरू असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.
या संपूर्ण प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, संबंधित संस्थांची चौकशी करावी तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा १९ मे २०२६ रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे…



