E-Paperटॉप न्यूज़दुनियादेशधर्मपिंपरी चिंचवडमहाराष्ट्रयुवाराजनीतिराज्य

महावितरणच्या पुनर्रचनेमुळे नवीन वीज जोडणीला ब्रेक?; ‘सिंगल विंडो सिस्टम’ची मागणी

महावितरणच्या पुनर्रचनेमुळे नवीन वीज जोडणीला ब्रेक?; ‘सिंगल विंडो सिस्टम’ची मागणी

पुणे | प्रतिनिधी | माझा इंडिया न्यूज 

दिनांक ०५जुलै २६

महावितरणमध्ये सप्टेंबर २०२५ पासून लागू करण्यात आलेल्या पुनर्रचना धोरणामुळे नवीन वीज जोडणीची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची व वेळखाऊ झाली असून ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा पुणे जिल्हा विद्युत नियंत्रण समितीचे सदस्य संतोष रमाकांत सौंदणकर यांनी उपस्थित केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी महावितरणचे नवनियुक्त संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांची भेट घेऊन ग्राहकांच्या हितासाठी ‘सिंगल विंडो सिस्टम’ लागू करण्याची मागणी केली.

देहू-आळंदी पालखी सोहळ्यानिमित्त महावितरणतर्फे आयोजित आढावा बैठकीसाठी पुणे दौऱ्यावर आलेल्या संचालक धनंजय औंढेकर यांचे संतोष सौंदणकर यांनी माऊलींची मूर्ती देऊन स्वागत व सत्कार केला. तसेच त्यांच्या नियुक्तीबद्दल शुभेच्छा देत नवीन वीज जोडणी प्रक्रियेत निर्माण झालेल्या अडचणींबाबत सविस्तर निवेदन सादर केले.

सौंदणकर यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पुनर्रचना धोरणानुसार ‘बिलिंग अँड रेव्हेन्यू’ आणि ‘ऑपरेशन अँड मेंटेनन्स’ विभागांचे स्वतंत्र कार्यविभाजन करण्यात आले. त्यामुळे नवीन वीज जोडणीसाठी अर्ज केल्यानंतर अनेक स्तरांवर मंजुरी घ्यावी लागत असल्याने प्रक्रिया विलंबित होत आहे. परिणामी ग्राहकांना विविध कार्यालयांमध्ये वारंवार हेलपाटे मारावे लागत असून त्यांचा वेळ, श्रम आणि आर्थिक खर्च वाढत आहे.

पूर्वी सेक्शननिहाय कार्यपद्धतीमुळे एका कार्यालयातूनच अर्ज निकाली निघत असल्याने ग्राहकांना जलद सेवा मिळत होती. मात्र, सध्याच्या पद्धतीत अर्ज प्रथम बिलिंग विभाग, त्यानंतर ऑपरेशन विभाग, काही प्रकरणांमध्ये कार्यकारी अभियंता आणि पुन्हा बिलिंग विभाग अशा टप्प्यांतून जात असल्याने डिमांड नोट किंवा कोटेशन मिळण्यास मोठा विलंब होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

प्रमुख मागण्या

  • पुनर्रचना धोरणाचा तातडीने आढावा घेऊन त्रुटी दूर कराव्यात.
  • शक्य असल्यास पूर्वीची सेक्शननिहाय कार्यपद्धती पुन्हा लागू करावी.
  • बिलिंग व महसूल विभागातील सक्षम अधिकाऱ्यांना नवीन वीज जोडणी मंजूर करण्याचे अधिकार द्यावेत.
  • नवीन वीज जोडणीसाठी ‘सिंगल विंडो सिस्टम’ सुरू करून सर्व प्रक्रिया एकाच कार्यालयातून पूर्ण करण्याची व्यवस्था करावी.

यावर सकारात्मक प्रतिसाद देताना महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी, “या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्यात आला असून पुढील महिन्यात याबाबत बैठक घेऊन त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या जातील,” असे आश्वासन दिले.

याबाबत संतोष सौंदणकर म्हणाले, “सुचविलेल्या सुधारणा अमलात आल्यास नवीन वीज जोडणीचा कालावधी कमी होईल, ग्राहकांचे हेलपाटे थांबतील, प्रशासनात पारदर्शकता वाढेल आणि महावितरणची ग्राहकाभिमुख प्रतिमा अधिक मजबूत होईल.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!