इंद्रायणी नदीपात्रात उतरू नका; आळंदी नगरपरिषदेचे भाविकांना आवाहन

इंद्रायणी नदीपात्रात उतरू नका; आळंदी नगरपरिषदेचे भाविकांना आवाहन

आळंदी, प्रतिनिधी : आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा २०२६ निमित्त आळंदी येथे लाखो भाविक दाखल होत असून, इंद्रायणी नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने नदीचा प्रवाह वेगवान झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी भाविकांनी इंद्रायणी नदीपात्रात स्नानासाठी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी उतरू नये, असे आवाहन आळंदी नगरपरिषदेने केले आहे.
नगरपरिषदेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, सर्व भाविक, वारकरी आणि नागरिकांनी नदीकाठावरील सुरक्षा सूचना, बॅरिकेडिंग तसेच प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. स्वतःच्या सुरक्षिततेसाठी नदीपात्रात जाण्याचा कोणताही प्रयत्न करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषद, पोलीस प्रशासन, महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि स्वयंसेवक भाविकांच्या सेवेसाठी सज्ज असून, पालखी प्रस्थान सोहळा सुरक्षित आणि सुरळीत पार पडावा यासाठी सर्वांनी जबाबदार नागरिक म्हणून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही नगरपरिषदेने केले आहे.




