
महाराष्ट्र आयकॉन २०२६ पुरस्काराने विनोद अष्टुळ सन्मानित

सोलापूर : सुप्रसिद्ध साप्ताहिक आपली चळवळ आणि जनसंवाद न्यूज यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ‘महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार २०२६’ देऊन सन्मान करण्यात आला. सोलापूर येथील शिवछत्रपती रंगभवन सभागृहात झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात मराठी भाषा, साहित्य, कला, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे चतुरस्त्र कवी विनोद अष्टुळ यांना मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या मंचावर महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, सुप्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील, कार्यक्रमाच्या अध्यक्षा तेजस्विनी कदम, मोहोळ पंचायत समितीचे सभापती असलम चौधरी, जिल्हा परिषद सदस्य बालाजी नरुटे, अरुणा शिवशरण, आपली चळवळ साप्ताहिकाचे संपादक गोरक्ष गायकवाड, जनसंवाद न्यूजचे संपादक कैलास रणदिवे, कार्यकारी संपादक पितांबर धिवार यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मराठी भाषा संवर्धनासाठी १४ वर्षांपासून कार्य
विनोद अष्टुळ यांनी गेल्या १४ वर्षांपासून मराठी भाषा संवर्धनासाठी सातत्याने कार्य केले असून, आतापर्यंत तब्बल २२८ कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. साहित्य सम्राट पुणे संस्थेच्या माध्यमातून त्यांनी उद्याने, मंदिरे, ग्रंथालये, दवाखाने, सुवर्णपेढ्या, अनाथाश्रम, विविध सभागृहे, पदपथ, गुहा तसेच स्मशानभूमीतही कवी संमेलने आयोजित केली आहेत.
शाळा, महाविद्यालये आणि विविध उत्सवांमध्ये ‘शब्द बोले काळजाला’ हा विशेष उपक्रमही ते राबवत आहेत. सर्वांसाठी खुले आणि विनामूल्य व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांनी अनेक नवोदित कवी, लेखक आणि साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून दिले आहे.
अष्टुळ हे महाराष्ट्र राज्य विशेष कार्यकारी अधिकारी असून भागीरथी नागरिक सहकारी पतसंस्थेचे संस्थापक संचालक आहेत. सहकार, कामगार, आध्यात्मिक, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातही ते विविध संस्थांच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत आहेत.
त्यांच्या कार्याची दखल घेत यापूर्वी त्यांना अण्णाभाऊ साठे, छत्रपती संभाजी महाराज, अटल बिहारी वाजपेयी, कुसुमाग्रज, आद्यकवी कालिदास, कवी संजीव, महाराष्ट्र भूषण, मोहम्मद रफी, टॉप टेन कवी, चतुरस्त्र कवी तसेच पुणे महानगरपालिकेचा गुणवंत गौरव यांसह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
याच उल्लेखनीय कार्याचा आढावा घेत आपली चळवळ आणि जनसंवाद न्यूज समूहाने विनोद अष्टुळ यांना ‘महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार २०२६’ प्रदान केला.
यावेळी मान्यवरांनी आपली चळवळ आणि जनसंवाद न्यूज ही माध्यमे खरी पत्रकारिता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करत असून, समाजासाठी प्रेरणादायी काम करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाला शिक्षण, साहित्य, सहकार, कला, कामगार आणि सामाजिक क्षेत्रातील रसिकांची मोठी उपस्थिती होती. उपस्थितांनी विनोद अष्टुळ यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मिसाळ यांनी केले. प्रास्ताविक अजय उदाटे यांनी, तर आभार प्रदर्शन राजेंद्र माने यांनी केले.
— माझा इंडिया न्यूज
#महाराष्ट्रआयकॉन2026 #विनोदअष्टुळ #महाराष्ट्रआयकॉन #सोलापूर #मराठीकवी #मराठीभाषा #मराठीसाहित्य #कवीसंमेलन #साहित्यिक #साहित्य #भाषासंवर्धन #आपलीचळवळ #जनसंवादन्यूज #पुरस्कारसोहळा #माझाइंडियान्यूज #MajhaIndiaNews #MaharashtraIcon2026 #VinodAshtul #SolapurNews #MarathiNews



