E-Paperदेशधर्मपिंपरी चिंचवडमहाराष्ट्र
Trending

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

आध्यात्मिक मूल्ये, सकारात्मक विचार आणि राजयोग ध्यानाचा संदेश

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

आध्यात्मिक मूल्ये, सकारात्मक विचार आणि राजयोग ध्यानाचा संदेश

पिंपरी :  दिनांक १८ सप्टेंबर २०२६ : प्रतिनिधी (माझा इंडिया न्यूज) गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागाने श्री गणेशाची आरती तसेच विविध आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमातून गणेशोत्सवाच्या माध्यमातून आध्यात्मिक मूल्ये, सकारात्मक विचार आणि राजयोग ध्यानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी लक्ष्मी दीदी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी डॉ. शर्मिला बहनजी यांनी श्री गणेशाच्या विविध स्वरूपांमागील आध्यात्मिक रहस्ये आणि त्यातून मिळणाऱ्या जीवनमूल्यांची सविस्तर माहिती दिली.

श्री गणेशाच्या प्रत्येक अवयवामागे विशेष आध्यात्मिक संदेश दडलेला असल्याचे डॉ. शर्मिला बहनजी यांनी सांगितले. गणेशाचे मस्तक दिव्य बुद्धीचे प्रतीक, मोठे कान शांतपणे ऐकून घेण्याचा संदेश, तर डोळे एकाग्रता आणि योगाचे प्रतीक मानले जातात. ‘लंबोदर’ या नावातून सर्व काही सामावून घेणारे व्यापक मन ठेवण्याचा संदेश मिळतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

गणेशाच्या रूपाकडे केवळ धार्मिक श्रद्धेच्या दृष्टीने न पाहता, त्यातील प्रतीकात्मक संदेश दैनंदिन जीवनात आत्मसात करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. संयम, विवेक, सकारात्मक दृष्टिकोन, एकाग्रता आणि सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती अंगीकारल्यास जीवन अधिक सुखी व संतुलित होऊ शकते, असा संदेश यावेळी देण्यात आला.

यानंतर ब्रह्माकुमारी लक्ष्मी दीदी यांनी उपस्थितांना राजयोग मेडिटेशनचा अभ्यास करण्याचे आवाहन केले. राजयोगाच्या माध्यमातून मनाला स्थिरता, सकारात्मक विचार आणि अंतर्मुखतेचा अनुभव घेता येतो, तसेच आंतरिक शक्तींची जाणीव होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला माउंट आबू येथे आयोजित मीडिया कॉन्फरन्सला उपस्थित राहिलेले ज्येष्ठ पत्रकार संतोष सागवेकर, संगीता पाचंगे, पूजा पंडित, सुनीता कुमारी, किसन भोसले आणि संतोष महामुनी सहभागी झाले होते. यावेळी पत्रकारांनी मीडिया कॉन्फरन्सदरम्यान आलेले अनुभव, मिळालेला आध्यात्मिक दृष्टिकोन आणि ब्रह्माकुमारी संस्थेच्या उपक्रमातून मिळालेला सकारात्मक संदेश उपस्थितांशी शेअर केला.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून धार्मिक श्रद्धेबरोबरच आध्यात्मिकता, आत्मचिंतन, सकारात्मक विचार आणि राजयोग ध्यानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पत्रकारांच्या सहभागामुळे ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रातील गणेशोत्सवाला विशेष स्वरूप प्राप्त झाले आहे.

— माझा इंडिया न्यूज
सत्य | निर्भीड | विश्वासार्ह

 

#श्री गणेश #आरती #महापूजा

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!