भारतातील सर्वात मोठी सायकल वारी! इंडो अथलेटिक्स सोसायटीच्या १० व्या पुणे–पंढरपूर वारीत २३५० सायकलस्वारांचा विक्रमी सहभाग

भारतातील सर्वात मोठी सायकल वारी! इंडो अथलेटिक्स सोसायटीच्या १० व्या पुणे–पंढरपूर वारीत २३५० सायकलस्वारांचा विक्रमी सहभाग

पुणे/पंढरपूर:
संपूर्ण भारतात क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रात अग्रेसर असलेल्या इंडो अथलेटिक्स सोसायटीतर्फे आयोजित करण्यात आलेली दहावी पुणे–पंढरपूर सायकल वारी शनिवारी (२० जून) मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. देहू येथील पवित्र गाथा मंदिरातून पहाटे प्रस्थान केलेल्या या वारीत तब्बल २३५० सायकलस्वारांनी सहभाग नोंदवत २३५ किलोमीटरचा भक्तीप्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला. यंदा या उपक्रमाने भारतातील सर्वात मोठी सायकल वारी म्हणून नवा इतिहास रचला आहे.
दहाव्या पर्वात मोडले सर्व जुने विक्रम!
यंदाचे वर्ष या सायकल वारीच्या महोत्सवी दहाव्या पर्वाचे असल्याने सायकलप्रेमींमध्ये अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. वारीचे प्रमुख गिरीराज उमरीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या वारीत ३०० महिला आणि १०० हून अधिक बालसायकलस्वारांचा लक्षणीय सहभाग होता. महाराष्ट्रासोबतच देशातील इतर राज्यांतूनही मोठ्या संख्येने नागरिक या आरोग्यदायी वारीत सामील झाले होते. सर्व सहभागींनी एकाच दिवसात देहू ते पंढरपूर हे अंतर पार केले.
मान्यवरांची मांदियाळी
या ऐतिहासिक वारीप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून सायकलस्वारांचा उत्साह वाढवला. यामध्ये पीसीएमसीचे बापूसाहेब गायकवाड, एमआयडीसीचे अधिकारी प्रकाश शेटबाळे, उद्योजक अन्नारे बिरादार, तात्यासाहेब शेवाळे, बैद्यनाथ हॉस्पिटल (संभाजीनगर) चे डॉ. संदीप सानप व अनिल सानप, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक श्रीराम पानझाडे यांच्यासह इंडो अथलेटिक्स सोसायटीचे गजानन खैरे, अजित पाटील, गणेश भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.
२०१६ मधील ७ जणांपासून सुरू झालेला प्रवास!
संस्थापक सदस्य गजानन खैरे यांनी वारीच्या प्रेरणादायी वाटचालीचा आलेख मांडला. २०१६ मध्ये अवघ्या ७ जणांपासून सुरू झालेली ही सायकल वारी दरवर्षी नवनवे विक्रम प्रस्थापित करत गेली.
२०१७ मध्ये २४, २०१८ मध्ये १६०, तर २०१९ मध्ये ५०० जण सहभागी झाले.
कोविडच्या कठीण काळातही हा उपक्रम खंडित झाला नाही; २०२१ मध्ये १७५ जणांनी यात सहभाग घेतला.
त्यानंतर २०२२ मध्ये १२००, २०२३ मध्ये १५००, २०२४ मध्ये १७५० आणि २०२५ मध्ये १९५० सायकलस्वार सहभागी झाले होते.
यंदा २०२६ मध्ये हा आकडा थेट २३५० वर पोहोचल्याने ही देशातील सर्वात मोठी सायकल वारी ठरली आहे. प्रमुख सदस्य अजित पाटील व गणेश भुजबळ यांनी संपूर्ण मार्ग आणि नियोजनाची जबाबदारी चोख सांभाळली.
असा होता वारी मार्ग:
ही सायकल वारी देहू – निगडी – नाशिक फाटा – हडपसर – उरुळी कांचन – भिगवण – इंदापूर – टेंभुर्णी ते पंढरपूर अशा २३५ किमीच्या मार्गावरून मार्गस्थ झाली. मार्गात ठिकठिकाणी वारीचे जंगी स्वागत करण्यात आले. इंदापूर येथे नगरपालिकेतर्फे नगराध्यक्ष भरतभाई शहा यांनी, तर टेंभुर्णी येथे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय बाबा कोकाटे यांनी सायकलस्वारांचे स्वागत व सहकार्य केले.
स्वयंसेवकांचे अथक परिश्रम
या भव्य उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गिरीराज उमरीकर, अविनाश चौगुले, अमित पवार, अनुप कोहले, अजित गोरे, अविनाश अनुसे, अभिजीत सरोदे, अजय चौरसिया, दीपक गुरुकुल, देविदास खुर्द, कपिल पाटील, मारुती विधाते, मंदार शेंडे, नितीन पवार, प्रदीप जी टाके, प्रमोद चिंचवडे, प्रणय कडू, प्रतीक पवार, प्रशांत तायडे, पवन आहेर, प्रशांत जाधव, रमेश माने, राहुल राणे, संतोष नखाते, सुनील चाकू, सुशील मोरे, श्रीकांत चौधरी, तुषार माने, विवेक कडू, योगेश तावरे, सुधाकर टिळेकर, शैलेश पाटील, अमृता पाटील, मनोज काशीद, नारायण मगडूत, मदन शिंदे, हेमंत दांगट पाटील यांच्यासह असंख्य स्थानिक सायकलिंग गट, सामाजिक संस्था आणि शेकडो स्वयंसेवकांनी दिवस-रात्र परिश्रम घेतले.
सायकलिंग, उत्तम आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि महाराष्ट्राची पारंपारिक वारकरी संस्कृती यांचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमाने समाजात आरोग्याचा आणि सकारात्मकतेचा एक नवा संदेश दिला आहे.



