शब्द, सूर अन् आठवणींचा सुरेल मंगेशकरी आविष्कार!
गाणी मंगेशकरांची’ मैफलीने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह भारावले; गीतनिर्मितीमागील आठवणी, रंजक किस्से अन् सुरेल सादरीकरणाने रसिकांची दाद

शब्द, सूर अन् आठवणींचा सुरेल मंगेशकरी आविष्कार!
‘गाणी मंगेशकरांची’ मैफलीने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह भारावले; गीतनिर्मितीमागील आठवणी, रंजक किस्से अन् सुरेल सादरीकरणाने रसिकांची दाद
पिंपरी | दि. ४ ऑक्टोबर २०२६

पिंपरी-चिंचवड शहरातील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शब्द, सूर आणि आठवणींचा सुरेल संगम अनुभवायला मिळाला. पं. हृदयनाथ मंगेशकर प्रस्तुत ‘गाणी मंगेशकरांची’ या सांगीतिक मैफलीने रसिकांना मंगेशकरी संगीताच्या भावविश्वात अक्षरशः चिंब भिजवले.
अभिजात मराठी भाषेचा जागर, तसेच मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत हा विशेष सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीतबद्ध केलेल्या लोकप्रिय गीतांनी प्रेक्षागृह सुरांनी भारून गेले. ‘माझ्या सारंगा’, ‘गोमू माझ्या तू संगतीने’, ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’, ‘चांदण्यात फिरताना’, ‘धरला तू माझा हात’, ‘मी डोलकर डोलकर’, ‘डोलकर दर्याचा राजा’, ‘घर पाण्यावरी’, ‘बंदराला करतो ये-जा’, ‘माझे रानी, माझे मोगा’, ‘तुजे डोळ्यांत शोधता ठाव’ आणि ‘मोगरा फुलला’ अशा लोकप्रिय गीतांच्या सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली.
गीतांमागच्या आठवणींनी मैफलीला वेगळीच उंची
या मैफलीचे वैशिष्ट्य केवळ गीतांचे सुरेल सादरीकरण नव्हते, तर त्या गीतांच्या निर्मितीमागील आठवणी आणि रंजक किस्से हे देखील ठरले. एखाद्या गीताची रचना कशी सुचली, शब्दांमधील भाव ओळखून त्याला चाल कशी लाभली, संगीतबद्ध करताना कोणते प्रसंग घडले, याबाबत पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी रसिकांशी संवाद साधत अनेक आठवणी उलगडल्या.
त्यामुळे अनेकदा ऐकलेली गाणी पुन्हा नव्या भावविश्वासह अनुभवण्याची संधी रसिकांना मिळाली.
लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या आठवणींनी वातावरण भावुक
भारत रत्न दिवंगत लता मंगेशकर आणि पद्मविभूषण आशा भोसले यांच्यासोबतच्या सांगीतिक प्रवासातील आठवणी सांगताना पं. हृदयनाथ मंगेशकर भावुक झाले. दोन्ही बहिणींसोबत काम करतानाचे अनुभव, त्यांचे स्वभाववैशिष्ट्य आणि गाण्याच्या सादरीकरणाशी संबंधित अनेक किस्से त्यांनी रसिकांसमोर मांडले.
तसेच कवयित्री शांता शेळके आणि गझलकार सुरेश भट यांच्या शब्दांमागील भावविश्व उलगडताना गीतनिर्मितीच्या प्रक्रियेतील अनेक रंजक प्रसंगही त्यांनी सांगितले.
विभावरी आपटे-जोशी यांच्या गायकीला उत्स्फूर्त दाद
गायिका विभावरी आपटे-जोशी यांनी आपल्या भावपूर्ण गायकीने या गीतांना सुरेल साज चढवला. ‘माझ्या सारंगा’पासून ‘मोगरा फुलला’पर्यंत प्रत्येक गीताचे भावविश्व त्यांनी आपल्या स्वरांनी जिवंत केले. प्रत्येक सादरीकरणानंतर रसिकांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त दादेमुळे मैफलीची रंगत अधिकच वाढत गेली.
‘अभिजात मराठी’ ही केवळ भाषेची संकल्पना नसून शब्द, आशय, काव्य आणि संगीत यांच्या समृद्ध परंपरेचा अनुभव आहे, याची प्रचिती या मैफलीतून आली. मराठीच्या अभिजात शब्दवैभवाला अभिजात संगीताची जोड मिळाल्याने रसिकांना भावनांचे अनेक पदर अनुभवता आले.
तबला साथ डॉ. राजेंद्र दुरकर आणि विक्रम भट, रिदमवर अजय अत्रे, बासरीवर अमर ओक, तर सिंथेसायझरवर दर्शना जोग यांनी साथसंगत केली. केदार परांजपे यांनी संगीत संयोजन केले.
या कार्यक्रमाला भारती मंगेशकर तसेच राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त गायिका सावनी रवींद्र यांची विशेष उपस्थिती लाभली.
माझा इंडिया न्यूज | सत्य | निर्भीड | विश्वासार्ह
#पिंपरी चिंचवड #गायक #संगीतकार #मैफल #गाणी मंगेशकरांनी



