आरक्षण उपवर्गीकरणासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये ‘जनआक्रोश महामोर्चा’
५८ जातींचा सहभाग; मातंग समाजासह विविध समाजघटकांचे नेते, पदाधिकारी मैदानात

आरक्षण उपवर्गीकरणासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये ‘जनआक्रोश महामोर्चा’
५८ जातींचा सहभाग; मातंग समाजासह विविध समाजघटकांचे नेते, पदाधिकारी मैदानात
पिंपरी | १४ ऑगस्ट २०२६

अनुसूचित जातीतील आरक्षणाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा आणि सर्व घटकांना आरक्षणाचा न्याय्य वाटा मिळावा, या मागणीसाठी आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये ‘जनआक्रोश महामोर्चा’ काढण्यात येणार आहे. आरक्षण उपवर्गीकरण समर्थन समितीच्या वतीने आयोजित या महामोर्चात अनुसूचित जातीतील ५८ जातींचे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याचे समितीने सांगितले.
चिंचवड स्टेशन ते निगडी तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा
मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता चिंचवड स्टेशन येथील आद्यक्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारकापासून महामोर्चाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर मोर्चा निगडीच्या दिशेने रवाना होऊन निगडी तहसील कार्यालयासमोर सांगता होणार आहे.
‘आरक्षणाचा लाभ वंचित घटकांपर्यंत पोहोचावा’
आरक्षणाचा लाभ समाजातील सर्व घटकांना समान पद्धतीने मिळणे आवश्यक आहे. काही घटकांना अपेक्षित लाभ मिळत नसल्याने त्यांच्यापर्यंत आरक्षणाचा लाभ प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी उपवर्गीकरण आवश्यक असल्याची भूमिका समितीने मांडली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांनुसार समाजातील प्रत्येक घटकाला विकासाची समान संधी मिळणे गरजेचे असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
वाल्मिकी, वडार आणि मादिगा समाजाचा पाठिंबा
आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आयोजित या महामोर्चाला वाल्मिकी, वडार आणि मादिगा समाजानेही पाठिंबा दर्शविला आहे. विविध समाजघटकांचे नेते व प्रतिनिधी पत्रकार परिषदेला उपस्थित होते. त्यामुळे महामोर्चाला व्यापक स्वरूप प्राप्त होत असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.
सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी
महाराष्ट्र सरकारने आरक्षण उपवर्गीकरणाबाबत तातडीने निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी, अशी प्रमुख मागणी महामोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. अनुसूचित जातीतील ५८ जातींच्या प्रतिनिधींचा या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे समितीने सांगितले.
तसेच महाराष्ट्रातील मातंग समाजातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने महामोर्चात सहभागी होणार असल्याचेही समितीने स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेला आमदार अमित गोरखे, बापू घोलप, भाऊसाहेब आडागळे, संदिपान झोंबाडे, अनिल सौंदडे, ॲड. सुशील मंचरकर, नेताजी शिंदे, गणेश लोंढे, गणेश अवघडे, भारत विटकर, मारुती पंदरी, मनोज तोरडमल, मयूर जाधव, संदीप जाधव, चंद्रकांत लोंढे, मारुती जाधव, अविनाश शिंदे, बाबासाहेब रसाळ, बाबासाहेब पाटोळे, अरुण जोगदंड, संजय ससाने, नितीन घोलप, सुनील भिसे, सुरज कांबळे, आशाताई बापू वाघमारे, कृष्णा साबळे, भानुदास नेटके, भगवान शिंदे, युवराज दाखले, सुरेश जोगदंड, शिवाजी साळवे, सतीश भवाळ, अविनाश लोणारी, संजय एडके, राजू आवळे, विठ्ठल झिंजुर्डे, नाना कांबळे, भाऊ कसबे, मारुती सोनटक्के, सागर कापसे, प्रसाद केसरे, स्वप्नील वाघमारे, मयूर घोलप, शंकर खवळे, ऋषी वाघमारे, शिवाजी खडसे, महादेव आडागळे, योगेश लोंढे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
‘आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने घेऊन त्याचा लाभ अनुसूचित जातीतील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा,’ अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली असून, महामोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
माझा इंडिया न्यूज
सत्य | निर्भीड | विश्वासार्ह





