E-Paperhttps://majhaindianews.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifटॉप न्यूज़दुनियादेशपिंपरी चिंचवडमहाराष्ट्रयुवाराजनीतिराज्यलोकल न्यूज़
Trending

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी यशवंत भोसले आक्रमक; अपर कामगार आयुक्तांसोबत लवकरच बैठक

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी यशवंत भोसले आक्रमक; अपर कामगार आयुक्तांसोबत लवकरच बैठक

बोनस, ग्रॅज्युटी, विमा, किमान वेतन आणि समान काम समान वेतनासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा कामगार मेळावा

पिंपरी, दि. ५ ऑक्टोबर २०२६ (प्रतिनिधी) – कंत्राटी, कायम आणि हंगामी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती कामगार नेते तथा राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी दिली.

संत तुकाराम नगर, पिंपरी येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज सभा मंडपात रविवारी (दि. ४ ऑक्टोबर) राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यशवंतभाऊ भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात कंत्राटी तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी बोलताना यशवंतभाऊ भोसले यांनी सन २०२५-२६ चा बोनस दिवाळीपूर्वी देण्यात यावा, तसेच सेवानिवृत्त झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमानुसार ग्रॅज्युटी आणि बोनसचा लाभ मिळावा, अशी मागणी केली.

तसेच सफाई कर्मचारी आणि नर्सेस यांना पाच लाख रुपयांपर्यंतची विमा पॉलिसी देण्यात यावी आणि या विम्याचा लाभ त्यांच्या कुटुंबीयांनाही मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांनी निश्चित केलेल्या किमान वेतन दराप्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन न देणाऱ्या तसेच वेतनामध्ये शोषण करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करून कर्मचाऱ्यांना कायदेशीर वेतन मिळेल, याची प्रशासनाने खात्री करावी, असेही त्यांनी सांगितले.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ४५० चौरस फुटांचे घर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही मेळाव्यात करण्यात आली. औद्योगिक आरोग्य व सुरक्षा संचालनालय तसेच एनजीटीच्या नियमांनुसार कर्मचाऱ्यांना आवश्यक आरोग्य व सुरक्षा साधने उपलब्ध करून द्यावीत. कर्मचाऱ्यांची वर्षातून दोन वेळा मोफत आरोग्य तपासणी करून आवश्यक उपचारांची सुविधाही उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी संघटनेने केली.

 

‘समान काम समान वेतन’ची मागणी

महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार ‘समान काम, समान वेतन’ लागू करावे, अशी मागणी यशवंतभाऊ भोसले यांनी केली. महानगरपालिकेतील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना ज्या स्वरूपाचे वेतन मिळते, त्याच कामासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही कायदेशीर तरतुदींनुसार योग्य वेतन मिळावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसह राज्यातील इतर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना विविध सुविधा मिळाव्यात, यासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने शासनाच्या संबंधित विभागांना लेखी निवेदन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, या विविध मागण्यांबाबत अपर कामगार आयुक्त, पुणे यांच्यासोबत लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे आश्वासन अपर कामगार आयुक्त अभय गीते यांनी संघटनेला दिले आहे, अशी माहिती यशवंतभाऊ भोसले यांनी दिली.

कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संघटनेची पुढील दिशा काय असेल, याबाबतही मेळाव्यात उपस्थित कंत्राटी, कायम आणि हंगामी कर्मचाऱ्यांना यशवंतभाऊ भोसले यांनी मार्गदर्शन केले.

#यशवंत भोसले #पिंपरी #राष्ट्रीय श्रमिक आघाडी #समान वेतन #कर्मचारी मागणी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!