भोसरीत भाजपाची ‘सेवा ज्योती यात्रा’; विकसित भारताचा संकल्प

भोसरीत भाजपाची ‘सेवा ज्योती यात्रा’; विकसित भारताचा संकल्प
‘विकसित भारत संकल्प सभा’तून राष्ट्रसेवा, जनसेवा आणि विकासाचा संदेश
पिंपरी-चिंचवड | माझा इंडिया न्यूज
भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने भोसरी येथे ‘विकसित भारत संकल्प सभा व सेवा ज्योती यात्रा’ आयोजित करण्यात आली. राष्ट्रविकास, जनसेवा आणि संघटन बळकटीकरणाचा संदेश देत भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांचा सहभाग लाभला. सेवा, सुशासन आणि विकास या त्रिसूत्रीच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संघटना अधिक सक्षम करण्यासोबतच सरकारच्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेला जनसहभागाची जोड देण्याचे आवाहनही करण्यात आले.
कार्यक्रमास आमदार शंकर जगताप, उमाताई खापरे, अमित गोरखे, महापौर रवी लांडगे, गटनेते प्रशांत शितोळे, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, विकास डोळस, मधुकर बच्चे, संजय पटनी, वैशाली खाड्ये, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव, महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पालांडे, नवनगर विकास प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, दक्षिण भारतीय आघाडी प्रभारी राजेश पिल्ले यांच्यासह विविध मंडलाध्यक्ष, आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
‘सेवा ज्योती यात्रा’तून जनसेवेचा संदेश
‘सेवा ज्योती यात्रा’च्या माध्यमातून राष्ट्रसेवा, जनसेवा आणि विकासाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे भोसरी परिसरात भाजपाच्या संघटनात्मक सहभागाचे चित्र पाहायला मिळाले.
यावेळी ‘संकल्प विकासाचा, ज्योत सेवेची आणि ध्यास विकसित भारताचा’ या भावनेतून संघटनात्मक कामाला अधिक गती देण्याचा संदेश देण्यात आला.
महेश लांडगे म्हणाले…
भाजपाचे आमदार महेश लांडगे म्हणाले, “‘विकसित भारत’ ही केवळ संकल्पना न राहता ती प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याची आणि नागरिकाची आहे. सेवा, सुशासन आणि विकासाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सातत्याने केला पाहिजे.”
‘सेवा ज्योती यात्रा’मुळे राष्ट्रसेवेची भावना अधिक दृढ झाली असून, विकसित भारताच्या संकल्पनेला जनसहभागाची जोड देत विकासाच्या प्रवाहात प्रत्येक घटकाला सहभागी करून घेण्याचा निर्धार करण्याचे आवाहन त्यांनी केले. संघटनेची ताकद कार्यकर्त्यांच्या एकजुटीत असल्याचेही लांडगे यांनी सांगितले.



