E-Paperटेक्नोलॉजीटॉप न्यूज़दिल्ली NCRदुनियादेशधर्ममहाराष्ट्रयुवाराजनीतिराज्य

डॉइचे बँक आणि मासूम यांनी पुण्यात LGBTQIA+ इव्हनिंग लर्निंग सेंटरची स्थापना

समावेशक शिक्षणाचा विस्तार आणि वंचित समुदायांसाठी रोजगाराच्या संधींच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल

डॉइचे बँक आणि मासूम यांनी पुण्यात LGBTQIA+ इव्हनिंग लर्निंग सेंटरची स्थापना

समावेशक शिक्षणाचा विस्तार आणि वंचित समुदायांसाठी रोजगाराच्या संधींच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल

प्रतिनिधी (माझा इंडिया न्यूज)

पुणे, २२ जून २०२६ – डॉइचे बँकने आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) शिक्षण कार्यक्रमांतर्गत, मासूमच्या सहकार्याने, आज पुण्यात LGBTQIA+ समुदायासाठी इव्हनिंग लर्निंग सेंटर (ELC) सुरू करण्याची घोषणा केली.
हे केंद्र महाराष्ट्रातील अशा प्रकारचे दुसरे केंद्र असून, २०२४ मध्ये मुंबई येथे सुरू झालेल्या पहिल्या LGBTQIA+ इव्हनिंग लर्निंग सेंटरच्या यशस्वी मॉडेलवर आधारित आहे. सामाजिक दुर्लक्षित, भेदभाव आणि आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या व्यक्तींना औपचारिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
पुणे इव्हनिंग लर्निंग सेंटर राष्ट्रीय मुक्त विद्यालयी शिक्षण संस्था (NIOS) मार्फत विद्यार्थ्यांना इयत्ता १० वीच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी मदत करेल. यामुळे त्यांना मान्यताप्राप्त शैक्षणिक पात्रता मिळवून उच्च शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधींकडे वाटचाल करता येईल. शैक्षणिक अध्यापनाबरोबरच या केंद्रात अध्ययन साहित्य, परीक्षा सहाय्य, जीवन कौशल्य प्रशिक्षण आणि करिअर मार्गदर्शनही उपलब्ध करून दिले जाईल.
पुण्यात LGBTQIA+ समुदायासाठी समर्पित असे पहिले शिक्षण केंद्र म्हणून हा उपक्रम समावेशक शिक्षणातील एक महत्त्वाची उणीव भरून काढतो. सुरक्षित, संरचित आणि विद्यार्थ्यांच्या ओळखीचा सन्मान करणारे शिक्षणाचे वातावरण उपलब्ध करून देणे हा या केंद्राचा उद्देश आहे.
डॉइचे बँक ग्रुप, भारत यांच्या CSR प्रमुख रुची खेमका म्हणाल्या,
“डॉइचे बँक अधिक सक्षम आणि समावेशक समाज निर्माण करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावते. वंचित समुदायांचे सक्षमीकरण ही आमच्या बांधिलकीची मध्यवर्ती बाब आहे. या इव्हनिंग लर्निंग सेंटरच्या माध्यमातून आम्ही पुण्यातील LGBTQIA+ समुदायातील सदस्यांना त्यांचे दहावीचे शिक्षण पूर्ण करण्यास आणि रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यास मदत करू इच्छितो.”
मासूमच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निकिता केतकर म्हणाल्या,
“पुण्यात आमच्या LGBTQIA+ इव्हनिंग लर्निंग सेंटर मॉडेलचा विस्तार हा शिक्षण अधिक समावेशक आणि सर्वांसाठी सुलभ करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला अशा वातावरणात शिकण्याची संधी मिळाली पाहिजे जे त्यांच्या ओळखीचा आदर करते आणि त्यांच्या क्षमतेला वाव देते. हा उपक्रम अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्यासोबत भागीदारी केल्याबद्दल आम्ही डॉइचे बँकेचे मनःपूर्वक आभारी आहोत.”
भारतातील LGBTQIA+ समुदायातील सदस्यांना आजही शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळवताना असमान आव्हानांचा सामना करावा लागतो. यामुळे त्यांचे शिक्षण मध्येच खंडित होते आणि उत्पन्नाच्या संधी मर्यादित राहतात. इव्हनिंग लर्निंग सेंटर मॉडेल या आव्हानांवर उपाय म्हणून तयार करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना सहाय्यक आणि समावेशक वातावरणात त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून देते.
या उद्घाटन कार्यक्रमाला डॉइचे बँक आणि मासूमचे प्रतिनिधी, LGBTQIA+ समुदायातील सदस्य, समुदाय भागीदार, माजी विद्यार्थी आणि नव्याने प्रवेश घेतलेले विद्यार्थी उपस्थित होते.
२०१५ पासून डॉइचे बँक आणि मासूम यांनी शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि वंचित समुदायांसाठी शिक्षणाच्या संधी वाढविण्यासाठी भागीदारी केली आहे. नाईट स्कूल, इव्हनिंग लर्निंग सेंटर आणि कौशल्य विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून या भागीदारीने हजारो विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, त्यांचे शिक्षण पूर्ण करणे आणि त्यांच्या उपजीविकेच्या संधी वाढविण्यास मदत केली आहे. डॉइचे बँक 25 रात्रशाळांना तसेच पुण्यामध्ये 10 वी साठी 3 आणि 12 वी साठी 1 अशा 4 सायंकालीन अध्ययन केंद्रांना मदत करीत आहे.
पुण्यातील LGBTQIA+ इव्हनिंग लर्निंग सेंटरची स्थापना ही शिक्षणाला संधी, सक्षमीकरण आणि सामाजिक समावेशनाचे प्रभावी साधन बनविण्याच्या दिशेने डॉइचे बँक आणि मासूम यांच्या सातत्यपूर्ण बांधिलकीचे प्रतीक आहे.
संपर्क तपशील:
नाव: मासूम
ईमेल: communications@masoomeducation.org
डॉइचे बँक विषयी👌
डॉइचे बँक ही जर्मनीतील आघाडीची बँक असून युरोपमध्ये तिचे मजबूत स्थान आहे तसेच अमेरिका आणि आशिया-पॅसिफिक प्रदेशातही तिची लक्षणीय उपस्थिती आहे. ही बँक कॉर्पोरेट आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंग, कॉर्पोरेट बँकिंग, रिटेल बँकिंग, अॅसेट मॅनेजमेंट आणि वेल्थ मॅनेजमेंटसह विविध वित्तीय सेवा कंपन्या, सरकारे, संस्थात्मक गुंतवणूकदार, लघु व मध्यम उद्योग आणि वैयक्तिक ग्राहकांना पुरवते.
डॉइचे बँक १९८० पासून भारतात कार्यरत असून कॉर्पोरेट आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंग, रिटेल बँकिंग, प्रायव्हेट वेल्थ मॅनेजमेंट आणि ग्लोबल बिझनेस सर्व्हिसेस या क्षेत्रांमध्ये सेवा पुरवते. देशभरातील १८ ठिकाणी सुमारे २५,००० कर्मचाऱ्यांसह ही भारतातील अग्रगण्य परदेशी वित्तीय सेवा पुरवठादारांपैकी एक आहे.
बँक आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांद्वारे शिक्षण आणि पर्यावरणीय शाश्वततेवर भर देत अधिक सक्षम आणि लवचिक समाज उभारण्यासाठी वचनबद्ध आहे. शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या संधी वाढविणे तसेच हवामान बदलास प्रतिसाद आणि पर्यावरण संरक्षणाला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमांचा उद्देश आहे. डॉइचे बँक समान विचारांच्या संस्थांसोबत भागीदारी करून अर्थपूर्ण आणि शाश्वत परिणाम घडवून आणण्यासाठी कार्य करते.
या उपक्रमांमध्ये कर्मचारी सहभाग महत्त्वाचा आहे. २०२५ मध्ये भारतातील डॉइचे बँकेच्या CSR कार्यक्रमांमुळे ४.१५ लाखांहून अधिक लोकांना लाभ झाला असून, सुमारे ४०% कर्मचाऱ्यांनी स्वयंसेवक म्हणून आपला वेळ आणि कौशल्य योगदान दिले.
www.db.com/india
मासूम विषयी
भारतातील नाईट स्कूल्सची गुणवत्ता वाढविण्याच्या उद्देशाने निकिता केतकर यांनी २००८ मध्ये मासूमची स्थापना एका जाज्वल्य उपक्रमाच्या रूपाने केली. नाईट स्कूलमधील गुणवत्तापूर्ण शिक्षणाद्वारे युवकांना अधिक चांगले शिकता यावे आणि अधिक चांगल्या उपजीविकेच्या संधी मिळाव्यात यासाठी नाईट स्कूल्सचे सक्षमीकरण, बळकटीकरण आणि परिवर्तन करणे हे संस्थेचे ध्येय आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या सहकार्याने मासूम सध्या मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतील १०० नाईट स्कूल्समध्ये कार्यरत आहे. संस्थेच्या टीममध्ये ८५ कर्मचारी आणि ११२ शिक्षक कार्यरत आहेत. २०२७ पर्यंत १२० नाईट स्कूल्सपर्यंत पोहोचून महाराष्ट्रातील २५,००० विद्यार्थ्यांवर सकारात्मक परिणाम घडविण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे. याशिवाय महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तराखंड येथे नाईट स्कूल कार्यक्रमाचा विस्तार म्हणून २९ इव्हनिंग लर्निंग सेंटर्स यशस्वीपणे सुरू करण्यात आले आहेत.
अधिक माहितीसाठी: https://www.masoomeducation.org/

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!