नेवाळे वस्तीतील स्टॉर्म वॉटर लाईनचे निकृष्ट काम उघड; नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू?

नेवाळे वस्तीतील स्टॉर्म वॉटर लाईनचे निकृष्ट काम उघड; नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू?

पिंपरी-चिंचवड | माझा इंडिया न्यूज
प्रभाग क्रमांक ११ मधील नेवाळे वस्ती परिसरात, बर्ड्स इंटरनॅशनल स्कूल शेजारी करण्यात आलेल्या स्टॉर्म वॉटर लाईनच्या कामातील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. रस्त्याच्या मध्यभागी असलेले चेंबर तुटलेल्या अवस्थेत उघडे पडले असून, केवळ प्लास्टिक बॅरिकेड लावून प्रशासनाने जबाबदारी झटकली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची ये-जा होत असल्याने कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तुटलेले चेंबर, रस्त्यावर विखुरलेले काँक्रीटचे तुकडे आणि निकृष्ट दर्जाचे काम यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, माजी नगरसेवक संजय नेवाळे आणि मारुती जाधव यांनी पावसाळ्यापूर्वीच स्टॉर्म वॉटर लाईन, ड्रेनेज लाईन तसेच नाल्यांच्या स्वच्छता व दुरुस्तीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याबाबत बोलताना मारुती जाधव म्हणाले, “नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत. आमचा उद्देश राजकारण नसून नागरिकांचे प्राण वाचवणे हा आहे. निकृष्ट कामांची चौकशी करून दोषी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.”
स्थानिक नागरिकांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, उघड्या चेंबरमध्ये एखादा दुचाकीस्वार किंवा शाळकरी विद्यार्थी पडून अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित केला आहे.
नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन प्रशासनाने धोकादायक चेंबरची दुरुस्ती करावी, निकृष्ट कामांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
– माझा इंडिया न्यूज



