E-Paperटॉप न्यूज़दुनियादेशमहाराष्ट्रयुवाराज्य

‘संविधान हत्या दिन’: आणीबाणीच्या ५१ व्या वर्षांनिमित्त दिघी येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यान संपन्न

संविधान हत्या दिन’: आणीबाणीच्या ५१ व्या वर्षांनिमित्त दिघी येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यान संपन्न

पिंपरी-चिंचवड: २५ जून १९७५ हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक काळा दिवस म्हणून ओळखला जातो. याच दिवशी देशावर आणीबाणी लादण्यात आली होती. या ऐतिहासिक घटनेला आता ५१ वर्षे पूर्ण होत आहेत. भारताची लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि संविधानाचा अपमान करणाऱ्या त्या काळातील काँग्रेस पक्षाचा काळा इतिहास तरुण पिढीला व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कळावा, या उद्देशाने दिघी येथील रामचंद्र गायकवाड विद्यालय ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आणीबाणीचे ५१ वे वर्ष’ आणि ‘संविधान हत्या दिन’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

राघव मंगल कार्यालय, दिघी येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रसिद्ध शिवव्याख्याते शुभम खेडेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी बोलताना शुभम खेडेकर म्हणाले की, “२५ जून १९७५ रोजी कोणताही सबळ कारण नसताना केवळ सत्तेसाठी आणि राजकीय फायद्याकरिता घटनेतील कलम ३५२ चा गैरवापर तत्कालीन सरकारने केला. तब्बल २१ महिने चाललेल्या या आणीबाणीत विरोधकांचा आवाज दाबला गेला आणि ‘मिसा’ कायद्याचा वापर करून जनतेवर अन्याय करण्यात आला. ही केवळ आणीबाणी नव्हती, तर ती संविधानाची हत्या होती. त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांनी संविधानाचा आदर करणे आणि त्याचे रक्षण करणे हे आपले परम कर्तव्य मानले पाहिजे.”
या कार्यक्रमास हजारो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आणीबाणीच्या भीषण वास्तवाविषयी माहिती जाणून घेतली आणि काही प्रश्नही विचारले. “संविधानाचे रक्षण आणि लोकशाहीचा आदर हीच आपली खरी ताकद आहे. येणाऱ्या पिढीला हा इतिहास माहित असणे ही काळाची गरज आहे,” असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

कार्यक्रमास आणीबाणी चे ५१ वे वर्ष या कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक ॲड. मोरेश्वर शेडगे, जिल्हा सरचिटणीस विकास डोळस, या कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक उदय गायकवाड, माजी उपमहापौर हिराबाई घुले, जिल्हा सहसंयोजक दिनेश यादव, उपाध्यक्ष संजय पटणी, कैलास सानप, रामचंद्र गायकवाड विद्यालय ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक विनोद वाळके सर, नगरसेवक कृष्णाजी सुरकुले, जिल्हा उपाध्यक्ष संतोष तापकीर, मंडल अध्यक्ष प्रमोद परदेशी, अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष रमेश विरणक, युवा मोर्चा मंडल अध्यक्ष सुशांत पवार, हृषिकेश भालेकर, अमित महाडिक, प्रमोद पठारे, दादासाहेब चितळे सर आणि अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद परदेशी यांनी केले, सूत्रसंचालन दादासाहेब चितळे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन नगरसेवक उदय गायकवाड यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!