पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पासाठी उद्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक; महापौरांसह सर्व प्रमुख लोकप्रतिनिधींना निमंत्रण

📰 माझा इंडिया न्यूज | दिनांक : २ जुलै २०२६

पिंपरी, दि. २ जुलै : पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील पाणीसुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पा संदर्भात उद्या (दि. ३ जुलै) मुंबई येथे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री सचिवालयामार्फत अधिकृत निमंत्रण देण्यात आले आहे.
बैठकीला महापौर रवि लांडगे, खासदार श्रीरंग बारणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर तसेच भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे उपस्थित राहणार आहेत.
पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प हा शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून भविष्यातील सुरक्षित, शाश्वत आणि अखंड पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सध्या खुल्या कालव्याद्वारे पाणीपुरवठा होत असल्याने पाणीगळती, बाष्पीभवन, प्रदूषण, अतिक्रमणे आणि देखभालीतील अडचणी निर्माण होत आहेत. बंदिस्त जलवाहिनीमुळे या समस्यांवर प्रभावी नियंत्रण मिळण्यास मदत होणार असून, पाण्याची बचत आणि जलपुरवठ्याची कार्यक्षमता वाढणार आहे.
महापौर रवि लांडगे यांनी सांगितले की, “हा प्रकल्प कोणत्याही एका पक्षाचा नसून पिंपरी-चिंचवडच्या लाखो नागरिकांच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याशी संबंधित आहे. शहराच्या विकासासाठी आणि भावी पिढ्यांच्या पाणीसुरक्षेसाठी हा प्रकल्प वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधी एकत्रितपणे शासनासमोर शहराची भूमिका मांडणार आहेत.”
महापौरांनी पुढे सांगितले की, मावळ तालुक्यातील सर्वपक्षीय कृती समितीकडून प्राप्त झालेल्या विविध मागण्या आणि निवेदनांतील मुद्देही मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले जाणार आहेत. पिंपरी-चिंचवडच्या पाणीसुरक्षेबरोबरच मावळ परिसरातील शेतकरी आणि स्थानिक नागरिकांच्या भावना व न्याय्य मागण्यांचाही सकारात्मक विचार करून सर्वमान्य तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल.
उद्याच्या बैठकीत प्रकल्पातील प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणी, आवश्यक मंजुरी, निधीची उपलब्धता, विविध विभागांतील समन्वय तसेच कामाचा कालबद्ध आराखडा यावर सविस्तर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
महापौरांसह सर्व प्रमुख लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा विषय मुख्यमंत्री स्तरावरील बैठकीपर्यंत पोहोचला आहे. या बैठकीतून पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाला आवश्यक गती मिळून पिंपरी-चिंचवडच्या दीर्घकालीन पाणीप्रश्नावर सकारात्मक आणि ठोस निर्णय होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
– माझा इंडिया न्यूज



