मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा; रायगडमधील शाळा-महाविद्यालयांना आज सुटी

📰 माझा इंडिया न्यूज | दिनांक : २ जुलै २०२६
मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा; रायगडमधील शाळा-महाविद्यालयांना आज सुटी
मुंबई, दि. २ जुलै : राज्यात मान्सूनने पुन्हा जोरदार मुसंडी मारली असून मुंबईसह संपूर्ण कोकण पट्ट्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
हवामान विभागाने मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईतील अनेक भागांत अवघ्या काही तासांत 100 ते 165 मिमी पावसाची नोंद झाली असून नागरिकांनी आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेऊन रायगड जिल्हा प्रशासनाने अलिबाग, पनवेल, उरण, श्रीवर्धन, म्हसळा, तळा आणि पोलादपूर तालुक्यातील सर्व अंगणवाड्या तसेच प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना गुरुवार, २ जुलै रोजी सुटी जाहीर केली आहे.
मात्र, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आवश्यकतेनुसार कार्यालयीन वेळेत उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रशासनाने नागरिकांना नदी, नाले आणि समुद्रकिनारी जाणे टाळण्याचे आवाहन केले असून, आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचे सांगितले आहे. पुढील २४ तास कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
– माझा इंडिया न्यूज




