टेक्नोलॉजीटॉप न्यूज़दुनियादेशधर्ममहाराष्ट्रयुवाराजनीतिराज्य

पालखी आगमनासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची जय्यत तयारी; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची प्रत्यक्ष पाहणी

पिंपरी-चिंचवड | माझा इंडिया न्यूज | २ जुलै २०२६

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सर्व तयारीला वेग दिला आहे. पालखी मार्ग, विसावा स्थळे आणि भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध सुविधांची महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या.

या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, उपायुक्त अण्णा बोदडे तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पाहणीची सुरुवात भक्ती-शक्ती चौकातून करण्यात आली. यावेळी महापालिकेच्या स्वागत कक्षाची पाहणी करून मेट्रोच्या कामामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्यानंतर विठ्ठलवाडी येथील पालखी तळ, दर्शन रांग, मंडप व्यवस्था तसेच मंदिर परिसरातील सुविधांचा आढावा घेण्यात आला.

भाविकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पालखी मार्गावरील अनधिकृत टपऱ्या व रस्त्यावर होणारे अतिक्रमण हटवण्याचे आदेश देण्यात आले. तसेच विसावा स्थळांवरील प्रकाश व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, शुद्ध पिण्याचे पाणी आणि स्वच्छता याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मैदानांमध्ये चिखल होऊ नये म्हणून तातडीने खडी टाकण्याचे निर्देश देण्यात आले. आकुर्डीतील खंडोबा चौक परिसरात मेट्रोच्या कामामुळे पालखीला अडथळा निर्माण होणार नाही, याची खातरजमा करून रस्ते दुरुस्ती, झाडांच्या फांद्या छाटणे आणि आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले.

दापोडी येथील संत तुकाराम महाराज पालखी विसावा स्थळाची पाहणी केल्यानंतर आयुक्तांनी समाधान व्यक्त करत आवश्यक सुधारणा तातडीने करण्यास सांगितले.

यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, “पालखी सोहळा हा लाखो भाविकांच्या श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा आणि मूलभूत सुविधा वेळेत व दर्जेदार पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे.”

— माझा इंडिया न्यूज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!