कासारवाडीत अत्याधुनिक श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज शाळेचे उद्घाटन; विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याचा महापालिकेचा संकल्प

कासारवाडीत अत्याधुनिक श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज शाळेचे उद्घाटन; विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याचा महापालिकेचा संकल्प

पिंपरी | माझा इंडिया न्यूज | २ जुलै २०२६
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कासारवाडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या अत्याधुनिक इमारतीचे उद्घाटन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यावेळी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्याची ग्वाही महापौरांनी दिली.
उद्घाटनप्रसंगी बोलताना महापौर रवि लांडगे म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय शिक्षणाबरोबरच वाचन संस्कृती जोपासणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड आणि विचारशक्ती विकसित व्हावी यासाठी ‘अक्षर विश्व’ ही संकल्पना प्रत्येक महापालिका शाळेत राबविण्यात येणार आहे. तसेच शिक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी ‘वारे गुरुजी पॅटर्न’ही टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहे.”
यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, शिक्षण समिती सभापती रविना अंगोळकर, नगरसदस्य जितेंद्र ननावरे, मनिषा लांडे, वर्षा जगताप, प्रतीक्षा जवळकर, रिटा सानप, श्रुती वाकडकर, माजी नगरसदस्य शाम लांडे, माऊली थोरात, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
महापौरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर त्यांनी नव्या इमारतीची पाहणी करून वर्गखोल्या, प्रयोगशाळा, सभागृहे आणि इतर सुविधांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत उपलब्ध सुविधांचा लाभ घेऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
नवीन पाच मजली शाळा इमारतीत २४ प्रशस्त वर्गखोल्या असून सुमारे ९६० विद्यार्थी येथे शिक्षण घेणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी संगणक कक्ष, रसायनशास्त्र प्रयोगशाळा, गणित प्रयोगशाळेसह पाच अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. याशिवाय नृत्य, कला व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी चार स्वतंत्र सभागृहे तसेच प्रशासकीय कामकाजासाठी चार स्वतंत्र कार्यालयांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत तंत्रज्ञानाधारित, गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक शिक्षण देण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या नव्या शाळेमुळे कासारवाडी परिसरातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधांसह शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र ननावरे यांनी केले, सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले, तर आभार मनिषा लांडे यांनी मानले.




