Uncategorized

महापालिका शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे आदर्श केंद्र बनाव्यात, हीच आमची भूमिका – महापौर रवि लांडगे

महापालिका शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे आदर्श केंद्र बनाव्यात, हीच आमची भूमिका – महापौर रवि लांडगे

विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी ज्ञानमंदिरात शिक्षण घेणारा प्रत्येक विद्यार्थी हा महत्त्वाचा घटक – आमदार शंकर जगताप

परीक्षेत गुण मिळविण्यासोबत व्यक्तिमत्त्व विकास घडविणे हा देखील शिक्षणाचा उद्देश – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

ढोल ताशांच्या गजरात, लेझीमच्या तालावर उत्साही आणि आनंदी वातावरणात शाळा प्रेवेशोत्सव उपक्रम साजरा

 

पिंपरी, दि. १५ जून २०२६- महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा आणि सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत, जिज्ञासू वृत्ती जोपासावी आणि अभ्यासासोबतच खेळ, कला व संस्कार यांनाही तितकेच महत्त्व द्यावे. पालक, शिक्षक आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडणार असून महापालिका शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आदर्श केंद्र तयार होतील अशीआमची भूमिका असल्याचे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

 

“भारत माता की जय’’ असा जयघोष करत ढोल ताशांच्या गजरात, लेझीमच्या तालावर उत्साही आणि आनंदी वातावरणात विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळेची घंटा आज वाजली. नवी उमेद आणि आशा घेऊन महापालिका शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत त्यांच्या पालकांसह मोठ्या हर्षोल्हासात भोसरी येथील इंद्रायणीनगर पी. सी. एम. सी. पब्लिक स्कूल येथे महापौर रवि लांडगे यांनी तर पिंपळेगुरव येथील पी. सी. एम. सी. पब्लिक स्कूल क्र. ५४ येथे आमदार शंकर जगताप आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सपत्निक उपस्थित राहून केले.

 

विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात शिक्षण समिती सभापती रविना अंगोळकर, नगरसदस्य शशिकांत कदम, ज्ञानेश्वर जगताप, शंकुतला धराडे, शाम जगताप, नम्रता लोंढे, पल्लवी जगताप, माजी नगरसदस्य सागर अंगोळकर, राजेंद्र लांडगे, विलास मडिगेरी, उप आयुक्त ममता शिंदे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, मुख्याध्यापिका गीतांजली पोळ, पर्यवेक्षक ज्योती तापकीर यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

महापौर रवि लांडगे म्हणाले, नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह पाहून समाधान वाटते. हीच मुले उद्याच्या विकसित भारताची शिल्पकार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित, आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण मिळावे यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने शिक्षण घ्यावे, नवीन गोष्टी शिकाव्यात आणि आपल्या कर्तृत्वाने कुटुंब, शहर व देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा देखील महापौर रवि लांडगे यांनी यावेळी दिल्या.

 

आमदार शंकर जगताप म्हणाले, नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण असतो. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, नवीन काहीतरी शिकण्याची जिज्ञासा आणि भविष्यात मोठे होण्याची स्वप्ने हीच आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यातील पायाभरणी आहे. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यामध्ये शिक्षण संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून ज्ञानमंदिरात शिक्षण घेणारा प्रत्येक विद्यार्थी हा त्या प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक आहे.

 

शिक्षक हे केवळ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील ज्ञान देत नाहीत, तर त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्याचे कार्य करतात. भावी पिढी सुसंस्कृत, सक्षम आणि जबाबदार नागरिक म्हणून घडविण्याची मोठी जबाबदारी शिक्षक पार पाडत आहेत. त्यामुळे शिक्षकांचे योगदान समाजासाठी अत्यंत मोलाचे आहे. महापालिकेच्या शाळांबाबत पालकांचा आणि समाजाचा दृष्टीकोन आता सकारात्मकपणे बदलत असल्याचे दिसून येत आहे. शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता, आधुनिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम यामुळे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. ही बाब निश्चितच समाधानकारक आहे. मात्र, शिक्षणाची गुणवत्ता आणखी उंचावण्यासाठी शिक्षकांची संख्या वाढविणे, ग्रंथालये अधिक सक्षम करणे तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असेही आमदार शंकर जगताप म्हणाले.

 

विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासातच प्रगती करून चालणार नाही, तर खेळ, कला आणि इतर उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. निरोगी शरीरातच निरोगी मन वसत असल्याने विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. घरगुती आणि पोषक आहार घेण्याची सवय लावावी, नियमित व्यायाम व खेळ यांना प्राधान्य द्यावे. शिक्षणासोबतच चांगले आरोग्य आणि सुदृढ व्यक्तिमत्त्व हे यशस्वी आयुष्याचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत, असे देखील आमदार शंकर जगताप यावेळी म्हणाले.

 

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, शिक्षण क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठे बदल झाले आहेत. पूर्वीच्या शिक्षण पद्धतीच्या तुलनेत आजची शिक्षण व्यवस्था अधिक आधुनिक, तंत्रज्ञानाधारित आणि विद्यार्थी केंद्रित झाली आहे. विद्यार्थ्यांना आता दर्जेदार शैक्षणिक सुविधा, डिजिटल साधने, प्रयोगशाळा तसेच विविध विषयांवरील समृद्ध पुस्तके उपलब्ध होत आहेत. या सर्व सुविधांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासासोबतच खेळ, कला, विज्ञान आणि इतर विविध क्षेत्रांमध्येही सक्रिय सहभाग घ्यावा. शिक्षणाचा उद्देश केवळ गुण मिळविणे नसून व्यक्तिमत्त्व विकास घडविणे हा देखील आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःमधील क्षमता ओळखून ती विकसित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत, असेही आयुक्त डॉ. सूर्यवंशी म्हणाले.

 

अभ्यास करताना किंवा नवीन गोष्टी शिकताना कोणतीही शंका निर्माण झाल्यास ती शिक्षकांना विचारण्यास अजिबात संकोच करू नये. शिक्षक हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्या शंका दूर करण्यासाठीच असतात. कोणाला काय वाटेल याचा विचार न करता जिज्ञासू वृत्ती जोपासणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी प्रश्न विचारण्याची सवय लावतात आणि त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात, तेच आयुष्यात पुढे जाऊन यशस्वी होतात, असे देखील आयुक्त डॉ. सूर्यवंशी यावेळी म्हणाले.

 

यावेळी आमदार शंकर जगताप आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश तसेच इतर शालेय साहित्य वाटप करण्यात आले. याशिवाय त्यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला तसेच शाळेमध्ये आवश्यक असलेल्या सोयीसुविधा किंवा सुधारणा याबाबत सविस्तर चर्चा केली.

 

अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम,विक्रांत बगाडे यांनी देखील केले विद्यार्थ्यांचे स्वागत

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पी. सी. एम. सी. पब्लिक स्कूल,श्रीमती लीलाबाई क्रांतीलाल खिंवसरा मोहननगर मुले शाळा,थेरगाव शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिलीमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश तसेच खाऊ वाटप करण्यात आला.

 

अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, नगरसदस्या अरुणा लंगोटे, वैशाली काळभोर, उप आयुक्त संदीप खोत, तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी नव्या शैक्षणिक वर्षाचा आनंद उत्साहात साजरा केला.

 

यावेळी आई वडील व शिक्षक जे सांगतात ते सर्व विद्यार्थ्यांनी ऐकले तर आयुष्यात तेच विद्यार्थी चांगले नागरिक म्हणून घडतात, असे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी सांगितले तर अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत चांगले संस्कार, शिस्त आणि जबाबदारीचे महत्त्व देखील समजावून सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!