पिंपरी चिंचवड पालिकेत ‘कचऱ्यात झोल’? भंगार व्यवहाराची चौकशी करण्याची जोरदार मागणी; BVG कंपनीला नोटीस!
पिंपरी चिंचवड पालिकेत ‘कचऱ्यात झोल’? भंगार व्यवहाराची चौकशी करण्याची जोरदार मागणी; BVG कंपनीला नोटीस!

पिंपरी: दिनांक , १७जून २०२६: प्रतिनिधी (माझा इंडिया न्यूज)पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या कचरा संकलन केंद्रांमध्ये (Transfer Stations) मोठ्या प्रमाणावर भंगार साहित्याचा गैरव्यवहार होत असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. कचरा व्यवस्थापनाचे काम पाहणाऱ्या बीव्हीजी (BVG) कंपनीचे काही अधिकारी आणि पर्यवेक्षकांच्या संगनमताने हे भंगार साहित्य अनधिकृतपणे विकले जात असून, यामध्ये लाखो रुपयांची आर्थिक अनियमितता झाल्याचा संशय सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी व्यक्त केला आहे.
🛑 काय आहेत मुख्य आरोप?
तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार, कचरा संकलन केंद्रांमध्ये रोज टनवारीने येणाऱ्या कचऱ्यातून मोठ्या प्रमाणावर मौल्यवान भंगार साहित्य वेगळे केले जाते. मात्र, या साहित्याची कोणतीही:
अधिकृत नोंद केली जात नाही…
नियमबाह्य पद्धतीने लिलाव प्रक्रिया टाळली जाते.
विक्रीतून मिळणारा महसूल पालिकेच्या तिजोरीत जमा न करता परस्पर लाटला जात आहे.
या संपूर्ण व्यवहारामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हक्काच्या महसुलाचे मोठे नुकसान होत असल्याचा संशय असून, यामध्ये सामील असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
⚠️ पालिकेची मंजुरी नसतानाच कारभार; आरोग्य विभागाची ‘नोटीस’
या प्रकरणी गंभीर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने तात्काळ पावले उचलली आहेत. आरोग्य विभागाचे प्रमुख श्री.ठेंगळ यांनी या प्रकरणाची प्राथमिक माहिती घेऊन संबंधित ‘बीव्हीजी’ कंपनीला तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
महानगरपालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी, अधिकृत ठराव अथवा वरिष्ठ पातळीवरून मंजुरी नसतानाही कचरा संकलन केंद्रातून हे भंगार साहित्य बाहेर कसे काढले जात होते? असा सवाल उपस्थित करत आरोग्य विभागाने हा अनधिकृत कारभार तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
💰 दरमहा लाखो रुपयांच्या ‘टक्केवारी’चा संशय?
प्राथमिक अंदाजानुसार, या कचरा केंद्रांमधून दरमहा लाखो रुपयांच्या भंगार साहित्याची बेकायदेशीर विल्हेवाट लावली जात आहे. मात्र, याची कोणतीही अधिकृत आकडेवारी पालिकेच्या दप्तरी उपलब्ध नाही. त्यामुळे केवळ नोटीस बजावून न थांबता, या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी समितीमार्फत चौकशी करण्यात यावी आणि सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
आता या नोटीसवर बीव्हीजी कंपनी काय उत्तर देते आणि पालिका प्रशासन दोषींवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




