
गोवंश संवर्धनासाठी तात्यासाहेब यादव यांचे २ एकर जमिनीचे दान; इंदापूरमध्ये उभारला सर्वात मोठा भगवा ध्वज
पिंपरी-चिंचवड | ३० जून २०२६ प्रतिनिधी (माझा इंडिया न्यूज)
गोवंश संवर्धनाच्या कार्याला मोठे बळ देणारी घटना इंदापूर तालुक्यात घडली आहे. शिवशाही व्यापारी संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष तात्यासाहेब यादव यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त गोवंश संवर्धन केंद्रासाठी तब्बल २ एकर जमीन स्वखुशीने दान केली आहे. यासोबतच इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठा भगवा ध्वज उभारण्यात आल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या उपक्रमाबद्दल शिवशाही शासन पक्षाचे लोकसेवक युवराज दाखले यांनी तात्यासाहेब यादव यांचे अभिनंदन करत आभार व्यक्त केले. ते म्हणाले, “तात्यासाहेबांनी केवळ जमीन दान केली नाही, तर निराधार, जखमी आणि वृद्ध गोवंशाला सुरक्षित आश्रय देण्याचा मार्ग खुला केला आहे. ही जमीन भविष्यातील शिवशाही गोशाळेचा भक्कम पाया ठरेल.”
यावेळी सुनील उर्फ दादासाहेब झोंबाडे यांनीही तात्यासाहेब यादव यांच्या कार्याचे कौतुक करत, “मातीशी नाळ जोडली की माणूस खऱ्या अर्थाने श्रीमंत होतो,” असे मत व्यक्त केले.
यावेळी तात्यासाहेब यादव यांनी, “मला कोणतेही पद किंवा प्रतिष्ठा नको. गोमाता सुखी राहावी, हीच माझी इच्छा आहे. शिवशाहीच्या माध्यमातून ही सेवा पुढेही अखंड सुरू ठेवणार,” असा संकल्प व्यक्त केला.
शिवशाही शासन पक्षाने या ठिकाणी आधुनिक गोवंश संवर्धन केंद्र उभारण्याचा मानस व्यक्त केला आहे. प्रस्तावित प्रकल्पामध्ये आधुनिक गोशाळा, गोवंशासाठी आरोग्य सेवा, गो-आधारित उद्योग तसेच शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देण्याची योजना आहे. याशिवाय दरवर्षी गोपाष्टमी महोत्सव आणि व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्याचाही पक्षाचा मानस आहे.
या उपक्रमामुळे गोवंश संवर्धनाबरोबरच नैसर्गिक शेतीला चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.




